चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण व प्रस्तावित पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करा- आशुतोष काळे

माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांनाही कोपरगावच्या नागरिकांना नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी कोपरगाव शहराच्या पाणी साठवण तलाव क्रमांक चारच्या विस्तारीकरणासाठी मोठया कष्टाने सव्वा दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता. त्यावेळी या साठवण तलावाचे कामही सुरु झाले होते. परंतु २०१५ साली या साठवण तलावाचे काम हे चौकशीच्या फे-यात अडकल्यामुळे व तांत्रिक अडचणीमुळे आजतागायत बंद आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहे. दिनांक २६ जुलै २०१८ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये चार नंबर साठवण तलावाचे प्रलंबित काम पूर्ण करून घेण्याबाबत ठरावही झालेला असतांना आज तीन महिन्याचा कालावधी उलटूनही नगरपालिकेकडून काम सुरु होण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. यावरून कोपरगाव नगरपालिकेला कोपरगावच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाविषयी गांभीर्य नसल्याचे जाणवत आहे. कोपरगाव नगरपालिकेने चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरु करावे अन्यथा कोपरगावच्या नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी जन आंदोलन उभारणार असल्याचा ईशारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. दिलेल्या पत्रात आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, तक्रारी व तांत्रिक अडचणीमुळे चार नंबर साठवण तलावाचा उर्वरित कामाचा निधी शासनाने परत घेतलेला आहे. कोपरगाव नगरपालिकेची पाणी पुरवठा योजनेची सध्याची साठवण क्षमता ६८ कोटी लिटर असतांना कोपरगावच्या नागरिकांना फक्त ३३ कोटी लीटरच पाणी मिळत आहे. चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण काम पूर्ण झाल्यास साठवण क्षमता ६ ते ८ कोटी लिटरने वाढणार आहे. त्यामुळे कोपरगावच्या नागरिकांना चार ते पाच दिवसांनी होणारा पाणी पुरवठा दोन ते तीन दिवसांनी होऊ शकतो. त्यासाठी चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरु करावे. तसेच कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या दुस-या पत्रात आशुतोष काळे यांनी प्रस्तावित पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्याची मागणी केलेली आहे. कोपरगाव नगरपालिकेकडे सध्याच्या साठवण तलावाच्या लगत २२ एकर जागा उपलब्ध असून सदरच्या जागेत प्रस्तावित पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे. जेणेकरून पाणी साठयाम्ध्ये मोठी वाढ होऊन नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. परंतु प्रस्तावित पाच नंबर साठवण तलावाचे आराखडे व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या सल्लागार संस्थेस त्यांचे सल्लागार मूल्य न दिल्यामुळे या साठवण तलावाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अपूर्ण आहे. कोपरगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावे व कोपरगाव शहराच्या विविध प्रश्नांसाठी आपण २२/१०/२०१८ रोजी आमरण उपोषण केले होते त्यावेळी कोपरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी साठवण तलावाचे काम सुरु करण्याबाबत आश्वासन दिलेले आहे तरीही आजपर्यंत साठवण तालावाचे काम सुरु होण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही नगरपालिकेकडून झालेली नाही. आज कोपरगावचे नागरिकांकडून दैनंदिन पाणी पुरवठ्याच्या हिशोबाने पाणी पट्टी वसूल केली जाते मात्र पाणी पुरवठा चार ते पाच दिवसांनी केला जातो हा नागरिकांवर मोठा अन्याय आहे. कोपरगाव शहराच्या नागरीकांचा अन्याय सहन करण्याची क्षमता आता संपलेली आहे.भविष्यात मोठ्या दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जायचे आहे हे भान ठेवून कोपरगाव नगरपालिकेने तातडीने चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरणाचे काम व प्रस्तावित पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्यासाठी तातडीने पावले उचलावी असे शेवटी आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram