सात नंबर अर्ज केलेल्या सर्वच शेतक-यांना पाणी द्या -- आशुतोष काळे

शेतीसाठी आवर्तन मिळणारच या आशेवर शेतक-यांनी थोड्या फार पाण्यावर गहू, हरबरा, मका आदी पिकांची पेरणी केलेली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही पाटबंधारे विभागाने रब्बीसाठी दोन आवर्तन देणार असे नुकतेच जाहीर केले आहे. परंतु शासनाने अडीच किलोमीटर पर्यंतच शेतीला पाणी देणार अशी चुकीची भूमिका घेतल्यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शासनाने उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी सुरु असलेल्या आवर्तनात कोणत्याही प्रकारची कपात करू नये. उन्हाळी आवर्तन मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे अतिशय अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी पाटबंधारे विभागाने सात नंबर पाणी मागणीचे अर्ज केलेल्या सर्वच शेतक-यांना सरसकट पाणी द्यावे अशा आशयाचे निवेदन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांना दिले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, सचिन रोहमारे, सुधाकर होन, जिनिग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, रोहिदास होन आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, यावर्षी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात विहिरींनी तळ गाठला आहे. कमी पर्जन्यमान झाल्यामुळे यावर्षी खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. पाटबंधारे विभागाने रब्बीचे दोन आवर्तन देणार असे जाहीर केल्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या परंतु पाटबंधारे विभागाने फक्त अडीच किलोमीटर पर्यंतच शेतीसासाठी पाणी देणार असल्याचा घेतलेला निर्णय लाभक्षेत्रातील शेतक-यांवर अन्याय करणारा आहे. मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांनी अतिशय कठीण परिस्थितीत उभ्या केलेल्या लाभक्षेत्रातील पिकांना आज पाण्याची निकड भासत आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत फक्त अडीच किलोमीटर पर्यंतच शेतीला पाणी देणार असा कोणताही निर्णय झालेला नाही. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळजन्य परिस्थिती असतांना कोपरगाव तालुक्यातील फक्त दहेगाव मंडलात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु पूर्ण लाभक्षेत्रच दुष्काळाच्या छायेत असतांना जर शेतक-यांना सिंचनासाठी वेळेवर पाणी मिळाले नाही तर शेतक-यांचे खूप मोठे नुकसान होऊन त्यांना जीवन जगणे असह्य होणार आहे. त्यासाठी आपण गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील एकही शेतकरी सुरु असलेल्या व भविष्यात देण्यात येणा-या आवर्तनापासून वंचित राहू नये यासाठी सरसकट सर्वच शेतक-यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram